मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ‘शालेय सहल बस’ उपक्रमातून महामंडळाला चांगला लाभ झाला. नोव्हेंबरमध्ये शालेय सहलीसाठी राज्यभरात विविध आगारातून २,२४३ बस आरक्षित झाल्या. यातून महामंडळाला १०.८५ कोटी रुपये महसूल मिळाला.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीयस्थळी सहलीला जाण्याचे वेध लागतात. नवनवीन ठिकाणांना भेटी देणे, तेथील विविध प्रकारची माहिती घेणे, नवीन जागेचा अनुभव घेणे, या गोष्टी सहलीतून विद्यार्थ्यांना समजतात. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देते. त्यामुळे अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना राज्यातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेट देणे शक्य होते. तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो. अर्थात, यावेळी एसटी महामंडळाकडे असलेल्या नवीन बस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. राज्यभरात एसटीच्या २५१ आगारांमधून दररोज ८०० ते १ हजार बस विविध शाळा- महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. नव्याकोऱ्या एसटीतून राज्यभरातील हजारो विद्यार्थी सहलीला गेले. नोव्हेंबरमध्ये २,२४३ एसटी बसमधून सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला. यावर्षी राज्यातील विविध विभागांमध्ये एसटीच्या शालेय सहलींना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पुन्हा एकदा स्पष्ट झाला. नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२५ मध्ये बससंख्या आणि उत्पन्न या दोन्हीमध्ये वाढ झाली.







