वृत्तसंस्था : इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले होते, त्याबद्दल इंडिगोने दिलगिरी व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे. ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी ज्यांच्या फ्लाइट रद्द झाल्यात, अशा प्रत्येक प्रवाशाला कंपनीकडून १०,००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देण्यात येणार आहे. हे व्हाउचर पुढील एक वर्षभर कोणत्याही इंडिगो फ्लाइट बुकिंगमध्ये वापरता येणार आहे.
कंपनीने मान्य केले की तीन दिवस अनेक प्रवाशांना तासंतास विमानतळावर थांबावे लागले, काहींच्या कनेक्टिंग फ्लाइट्स चुकल्या, तर काहींची महत्त्वाची कामे झाली नाहीत. इंडिगोने म्हटलं आहे की, “हा काळ आमच्यासाठी आणि प्रवाशांसाठी कठीण होता. या गैरसोयीची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो.” भारताच्या नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, २४ तासांच्या आत फ्लाइट रद्द झाल्यास एअरलाइनला प्रवाशांना भरपाई देणे बंधनकारक आहे. या आधारे प्रवाशांना ५,००० ते १०,००० रुपये अतिरिक्त भरपाई मिळू शकते. याचा अर्थ अंतर जास्त असेल तर काही प्रवाशांना एकूण २०,००० रुपयापर्यंतची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. इंडिगोने सांगितले की रद्द झालेल्या फ्लाइट्सची रिफंड प्रक्रिया करण्यात येत असून उर्वरित रिफंड लवकरच दिला जाणार आहे.







