मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन प्रवाशांना आता केवळ प्रवासाचा अनुभव देणार नाही, तर कामासाठीसुद्धा एक आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त जागा उपलब्ध करून देणार आहे. पश्चिम रेल्वेने उभारत असलेल्या अत्याधुनिक ‘डिजिटल लाउंज’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरच्या मध्यापासून ते सार्वजनिक वापरासाठी खुले होण्याची शक्यता आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे लाउंज उभारले जात असल्याने याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुमारे २.१७ कोटी रुपये खर्च आणि १,७१२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेले लाउंज मुंबई सेंट्रल येथे उभे राहत आहे. प्रवाशांना ट्रेनची प्रतीक्षा करताना काम करता यावे, ऑनलाईन मीटिंग घेता यावी किंवा विद्यार्थ्यांना शांत अभ्यासाची जागा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्या स्टेशनवर साधे प्रतीक्षालय आणि शुल्क आकारले जाणारे एक्झिक्युटिव्ह लाउंज उपलब्ध असले तरी ते कामकाजासाठी सोयीचे नसते. दरम्यान, नवीन डिजिटल लाउंजमध्ये मात्र हाय-स्पीड वायफाय, आरामदायक खुर्च्या-टेबल, मोफत वीज, अनेक चार्जिंग पॉइंट्स, तसेच कॅफे सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ट्रेन येण्याआधी काम करण्यासाठी हॉटेल किंवा कॅफेमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, ही सुविधा सुरू झाल्यानंतर व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी स्टेशनवरील वेळ अधिक उपयोगी आणि सोयीचा ठरेल.







