वृत्तसंस्था : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठीत आणि लोकप्रिय रणजी करंडक स्पर्धेच्या नव्या हंगामासाठी संघ तयार होत आहेत. या स्पर्धेसाठी बिहारच्या रणजी संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे रणजी सामन्यासाठी वैभव सूर्यवंशी फक्त बिहार संघाचा भाग नाही तर त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिहार संघाने रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. साकिबुल गनीच्या नेतृत्वाखालील संघात वैभव सूर्यवंशी याच्याकडे उप कर्णधार पद देण्यात आले आहे. साकिबुल गनी याच्या नावे प्रथम श्रेणीत त्रिशतक झळकाल्याचा रेकॉर्ड आहे.२३ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने पाच शतक आणि पाच अर्धशतकाच्या मदतीने १८१४ धावा केल्या आहेत. यात ३४१ ही त्याची प्रथम श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
वैभव सूर्यंवशी याने आतापर्यंत ५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावे १०० धावांची नोंद आहे. ६ लिस्ट ए सामन्यात त्याने १३२ धावा केल्या आहेत. वैभव सूर्यंवशीनं २०२४ मध्ये आपला पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील यूथ कसोटी सामन्यात वैभव सूर्यवंशीनं ११३ धावांची खेळी केली होती. रणजी स्पर्धेत त्याच्याकडून संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. बिहारचा संघ यंदाच्या रणजी हंगामासाठी अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या लढतीनं सुरुवात करणार आहे. १५ ऑक्टोबरला हे दोन्ही संघ समोरासमोर येतील. त्यानंतर २५ ऑक्टोबरला बिहारचा संघ मणिपूर विरुद्ध दुसरा सामना खेळताना दिसेल. या दोन सामन्यासाठी बिहारच्या संघाने उप- कर्णधारपद दिले आहे.