पुणे : राज्यातील तंत्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी जपानमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी जपानशी करार करण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये सीईटी घेऊन जूनपर्यंत एक हजार मुले निवडण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शिवस्वराज्य चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे लेडी रमाबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, सचिव सागर शेडगे, शशांक मोहिते, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव या वेळी उपस्थित होते. फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगरचे शिक्षक दत्तात्रय वारे, क्विक हिलचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर यांना आधारवड पुरस्कार, पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
पूरग्रस्त भागातील काही महाविद्यालयांना मदत करण्याची जबाबदारी अन्य महाविद्यालयांवर देण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘मुलींच्या मोफत शिक्षण योजनेत यंदा ५३ हजारांनी मुलींची संख्या वाढली. गेल्या चार वर्षांपासून राबवण्यात येत असलेल्या स्कूल कनेक्ट या कार्यक्रमामुळे तंत्रनिकेतनचे प्रवेश १ लाख ७ हजारांहून अधिक झाले. मराठा समाजातील ७५ विद्यार्थ्यांना दीड कोटी रुपये परदेशात शिक्षणासाठी दिले जातात. तसेच, ओबीसी, एसटी, एनटी, अल्पसंख्यांक अशा एकूण पावणे चारशे विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरकारी योजनांसह शिष्यवृत्ती देणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र, माहितीचा अभाव, कंटाळा, निष्काळजीपणा हे विकासातील अडसर आहेत.’ ‘जगात आता मनुष्यबळासाठी भारताकडे पाहिले जात आहे. राज्यातील तरुणांना जर्मनीत पाठवण्यासाठी चार वर्षांपूर्वी जर्मनीशी करार करण्यात आला. तसेच, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीच्या मुलांना तीन आणि चार वर्षांचे शिक्षण जपानमध्ये मोफत दिले जाणार आहे. त्यासाठीचा करार करण्यात येणार आहे. सरकारकडूनच त्या मुलांना पासपोर्ट, व्हिसा, तिकीट काढून दिले जाणार आहे. त्यांचे राहणे, भोजन, शिक्षणाचीही सोय होणार आहे. जपानकडे तरुणच नसल्याने त्यांची महाविद्यालये ओस पडत आहेत. जपानकडे संशोधनासाठीही निधी आहे. पीएच.डी., संशोधनासाठीही निधी मिळणार आहे,’ असेही पाटील यांनी सांगितले.