मुंबई : सेवा निवृत्ती जवळ आलेल्या अधिकाऱ्यांना बढती देवून बक्षिसी दिली जाते, परंतु उपक्रम तोट्यात असल्याचे कारण दाखवून वाहतूक विभागातील, परिवहन अभियांत्रिकी विभागतील आणि विद्युतपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बढती नाकारली जाते, असा आरोप बेस्ट कामगार सेनेने केला आहे. अधिकाऱ्यांना बढती देताय, मग कामगारांनाही द्या, अशी मागणीही संघटनेने केली आहे. आता माघार नाही, पाठपुरावा करणारच, जोवर कर्मचाऱ्यांना बढती मिळत नाही, तोवर स्वस्थ बसणार नाही, असाही इशारा बेस्ट कामगार सेनेने दिला आहे.
सेवा निवृत्तीला जेमतेम १५ दिवस शिल्लक असताना बेस्ट उपक्रमात एका अधिकाऱ्याला उपमहाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक पद सोडून आणखी वरच्या पदावर अशी (जंपिंग) बढती देण्यात आली आहे. सेवा निवृत्तीला पंधरा दिवस शिल्लक असताना दिलेल्या या बढतीमुळे बेस्टच्या तिजोरीवर भार येणार आहे. त्यामुळे बेस्टमधील दोन मोठ्या कामगार संघटनांनी या बढतीला विरोध केला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) बेस्ट कामगार सेनेने आणि खासदार नारायण राणे यांच्या समर्थ बेस्ट कामगार संघटनेनेही या अधिकाऱ्याच्या बढतीला विरोध केला आहे. या दोन्ही संघटनांनी बेस्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन या बढतीला विरोध केला आहे. कामगार सेनेने मंगळवारी बेस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली व अधिकाऱ्यांना जशी बढती दिली तशी कामगारांनाही द्या, पदभरती करा, अशी मागणी केली. यावेळी बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी या विषयावर बेस्ट उपक्रमाचे कर्मचारीय विभागाचे वरिष्ठ कर्मचारीय व्यवस्थापक सुशील पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यास सांगितले.







