पिंपरी : पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गिकेसाठी १७ झाडे तोडल्यानंतर आता चार मेट्राे स्थानकांना अडथळा ठरणारी १६२ झाडे ताेडण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव महामेट्राेने महापालिकेच्या उद्यान विभागाला सादर केला आहे.
शहरात पिंपरी ते दापाेडी या साडेसात किलोमीटर मार्गावर मेट्राे धावत आहे. पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी ही सहा मेट्राे स्थानके आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.५ किलोमीटर अंतर मेट्रो मार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी ९१० कोटी १८ लाखांचा खर्च आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक आणि भक्ती-शक्ती समूह शिल्प अशी चार स्थानके आहेत. ती उभारण्यासाठी अडथळा ठरणारी चिंचवड स्टेशनसह या मार्गावरील १६२ झाडे ताेडण्यासाठी महामेट्राे प्रशासनाने महापालिकेच्या उद्यान विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.






