पुणे : पुणे शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असून, स्वारगेट येथील मच्छि मार्केटशेजारी असलेल्या कॅनॉलजवळील रिकाम्या जागेत जूगार खेळताना गुन्हे शाखेच्या यूनिट दोनने छापा कारवाई केली. सहा जणांना पकडून त्यांच्याकडून जूगाराचे साहित्य, रोकड असा ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिरामण धोत्रे (वय ४१), अनंत मुंगारे (वय ६६), योगेश भडकवार (वय २९), राहूल मोरे (वय ३८), सचिन पाटील (वय ३२), विकास रमावत (वय २५) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने अनेक भागात जुगार, मटका अड्डे सुरू असल्याचे दिसत आहे. अनेकदा स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष्य करतात. त्यामुळे अशा धंद्यांना अभय मिळत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, स्वारगेट येथील मच्छि मार्केटजवळील मैदानात काहीजण जूगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानूसार गुन्हे शाखा यूनिट दोन तसेच स्वारगेट पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी तिथे सहा ते सातजण कल्याण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ३२ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, रोकड असा मुद्देमाल जप्त केला. स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.





