पनवेल : ॲक्सिस बँकेचे पर्सनल लोन करून देण्याच्या बहाण्याने कळंबोलीत राहणाऱ्या तरुणीच्या खात्यातून १४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिल्ली येथील टोळीतील एका आरोपीला पनवेल सायबर सेलने अटक केली आहे. या टोळीतील इतर तीन फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात फसवणूक झालेली २६ वर्षीय तरुणी कळंबोली येथे राहण्यास असून जून महिन्यामध्ये एका सायबर टोळीने या तरुणीचे इंटरनेट बँकिंग सुरू करून त्याद्वारे तरुणीच्या नावाने ॲक्सिस बँकेतून परस्पर १४ लाख रुपयांचे पर्सनल लोन मंजूर करून घेतले होते. कर्जाची रक्कम तरुणीच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर सायबर टोळीने ॲक्सिस बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवून तरुणीला संपर्क साधला, तसेच तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्याकडून ओटीपी शेअर करून घेऊन त्याद्वारे टोळीने तरुणीच्या बँक खात्यातून १४ लाखांची रक्कम इतर बँकेत ट्रान्स्फर करून फसवणूक केली होती. याबाबत कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेलच्या सायबर सेलने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. पनवेल येथील सायबर सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली पाटील व त्यांच्या पथकाने गुन्ह्यातील बँक व्यवहाराचे विश्लेषण केले. या तांत्रिक तपासात फसवणूक करणारी संशयित टोळी ही दिल्ली येथील असल्याचे स्पष्ट झाले.
सायबर सेलने या टोळीचा माग काढत एका आरोपीला दिल्ली येथून सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली पाटील यांनी दिली. पनवेल सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र यमगर, पोलिस हवालदार वैभव शिंदे, रमेश वैद्य, पोलिस नाईक दादा माने, पोलिस शिपाई नितीन जावरे, प्रगती म्हात्रे, दीपक चौधरी यांनी ही यशस्वी कारवाई केली.





