मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत पिस्तुलांसह २३ वर्षीय तरूणाला अटक केली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्याच्याकडून चार जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मागे आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
जोगेश्वरी परिसरात एक संशयीत शस्त्रांसह येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१० च्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जोगेश्वरी पूर्व येथील जेव्हीएलआर परिसरातील दत्त मंदिरासमोर सापळा रचला होता. काही वेळाने एक तरूण तेथे आला. त्याचे तेथे घुटमळणे पोलिसांना संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्याला हटकले. येथे काय काम असल्याचे विचारले असता आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊन लागला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बॅग व अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले व आरोपीकडील पिस्तुले जप्त करण्यात आली. देशी बनावटीची पिस्तुले असून त्याची चार जिवंत काडतुसेही सापडली. अखेर याप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून ते प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपीला सोमवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. रोहित रामगणेश यादव(२३) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी शस्त्र विक्रीसाठी मुंबईत आल्याचा संशय आहे. त्याबाबत त्याची चौकशी सुरू आहे.





