मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. याआधी लागू असलेले आदेश २५ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आल्यानंतर नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार पोलिसांची पूर्वपरवानगी नसताना ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, सभा घेणे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्यवृंद आणि मोठ्या आवाजाचे फटाके वापरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आदेश लागू करण्यात आले असून, दिवाळीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन अधिक सतर्क राहणार आहे. मात्र, हा कोणताही संचारबंदीचा आदेश नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रतिबंधात्मक आदेशांमधून अनेक नियमित आणि आवश्यक उपक्रमांना सूट देण्यात आली आहे. लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रम, अंत्ययात्रा, दफनविधी, कंपन्या व सहकारी संस्थांच्या नियमित बैठका, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शासकीय कार्यालये आणि न्यायालयांचे नियमित कामकाज पूर्ववत सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना किंवा मिरवणुका आयोजित करताना संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक असून, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. दिवाळी सण शांतता, सुरक्षितता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

