ठाणे : शेअर बाजारात गुंतवणुकीतून अधिकच्या परताव्याचा मोह उल्हासनगरात एका महिलेला महागात पडला आहे. ऑनलाईन शेअर खरेदी करण्यासाठी एका ऍपच्या माध्यमातून महिलेने तब्बल ३१ लाख २७ हजार रूपयांची गुंतवणूक केली. मात्र ते पैसे परत मिळवण्यासाठी आणखी १० लाख देण्याची मागणी आरोपीने केली. त्यानंतर या गुंतवणुकीतील सत्य समोर आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापुरात दोनच दिवसांपूर्वी अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचे समोर आले होते.
गेल्या काही वर्षात ऑनलाईन गुंतवणुकीच्या जाळ्यात अनेक व्यक्ती अडकताना दिसत आहेत. ऑनलाईन फसवणुकीबाबत असलेले अज्ञान, अतिरिक्त परताव्याचा मोह, कमी कालावधीत पैसे दुप्पट करून मिळण्याचे आश्वासन आणि सहज ऑनलाईन माध्यमातून मोबाईलवरूनच गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात असल्याने हे प्रकार वाढले आहेत. अधिकृत जाहीर परताव्याच्या दरापेक्षा अधिकच्या परताव्याच्या मोहात अनेकांचे लाखो रूपये बुडाले आहेत. गेल्या काही वर्षात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या नोकरदार वर्गाच्या शहरातही उच्च शिक्षितांमध्ये अशा फसवणुक झालेल्यांची संख्या अधिक आहे.







