वृत्तसंस्था : मोबाईल फोन आणि सोशल मीडिया आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनले आहेत. पण माहितीची देवाणघेवाण आणि जवळच्या लोकांसोबत संपर्क या उपयोगांपलीकडे या माध्यमांमुळे होणारं नुकसान हा चिंतेचा विषय बनला आहे. म्हणूनच अनेक देशांत लहान मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची चर्चा होते आहे.
१० डिसेंबर २०२५ रोजी ऑस्ट्रेलिया हा १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा पहिला देश ठरला.या अंतर्गत मुलांची इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, टिकटॉक आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवरील खाती बंद करण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या मते यामुळे मुलांना धोक्यांपासून वाचवता येईल. पण टीकाकारांच्या मते यामुळे मुले अनियंत्रित प्लॅटफॉर्म्सचा वापर सुरू करण्याचा धोका वाढू शकतो. अनेक इतर देशांचे नेते या निर्णयावर लक्ष ठेवून आहेत. भारतातही यावर चर्चा होते आहे.






