नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी एका ऐतिहासिक संरक्षण कराराची घोषणा केली आहे. याअंतर्गत भारत आणि फ्रान्स मिळून जगातले एकमेव अशा प्रकारचे हेलिकॉप्टर भारतात बनवणार आहेत, जे माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत (८,८४८ मीटर) उड्डाण करण्यास सक्षम असेल.
हे हेलिकॉप्टर एअरबस H125 (Airbus H125) मॉडेल असून ते एक ‘लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर’ आहे. कर्नाटक राज्यातील वेमगल (Vemagal) येथे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स आणि एअरबस यांच्या संयुक्त भागीदारीतून ही ‘फायनल असेंब्ली लाईन’ उभारली जात आहे. हे हेलिकॉप्टर हिमालयीन सीमा भागातील कठीण हवामानात आणि अतिउंच ठिकाणी लष्करी तसेच नागरी कामांसाठी (उदा. शोध मोहीम, वैद्यकीय मदत) अत्यंत उपयुक्त ठरेल. भारतात तयार होणारी ही हेलिकॉप्टर्स केवळ भारतीय गरजा भागवण्यासाठी नसून ती संपूर्ण जगाला निर्यात (Export) देखील केली जातील. ‘मेड इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत तयार होणाऱ्या या पहिल्या हेलिकॉप्टरची डिलिव्हरी २०२७ च्या सुरुवातीला होण्याची अपेक्षा आहे






