मुंबई : मुंबईतील कबुतरखान्याच्या वादानं पुन्हा राजकीय रंग घेतला असून, जैन मुनींनी सरकारला इशारा देत थेट पालिका निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. दादर येथील योगी सभागृहात आयोजित जैन धर्मसभेत कैवल्य रत्न महाराजांनी “कबुतरांसाठी एक-दोन जण मेल्यानं काय फरक पडतो?”, असं विधान करीत वादाला तोंड फोडलं आहे. तर या सभेत जैन साधू निलेश मुनींनी पालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षाची घोषणा केली. कबुतरांसाठी ‘शांतीदूत जन कल्याण पार्टी’ची स्थापना करून त्यांचं चिन्ह ‘कबूतर’ असल्याचं सांगत, त्यांनी ‘कबुतरांमुळे सत्ता जाईल’ असा इशारा राज्यातील महायुती सरकारला दिला आहे. मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून महावीर मिशन ट्रस्टनं दादर इथं ही धर्मसभा आयोजित केली. सभेला हजारो जैन अनुयायी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जैन साधू निलेश मुनी म्हणाले, “सरकारला माझा नाही, सनातन धर्माचा इशारा आहे. महाराष्ट्राचा मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाही. त्यांना राजकारणासाठी कबूतर आणायचे आहेत. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही. जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो. आता आमचीही संघटना असणार आहे. आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू… कबुतरांची पार्टी पाहिजे. शिवसेनेतही वाघ होता,” असं म्हणत त्यांनी ‘शांतीदूत जन कल्याण पार्टी’ची घोषणा केली. जैन साधू निलेश मुनी म्हणाले, “ही फक्त जैनांची पार्टी नाही, ही गुजराती-मारवाड्यांची पार्टी आहे. आमच्या जन कल्याण पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री आहे,” असं ते म्हणाले. पक्षाचं चिन्ह ‘कबूतर’ असल्याची घोषणाही यावेळी झाली. “कांद्यामुळं काँग्रेसचं, कोंबडीमुळं शिवसेनेचं सरकार गेलं. आता कबुतरांमुळं महायुतीला किंमत मोजावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. तसंच शिवसेना आमदार मनीषा कायंदेंवरही त्यांनी टीका केली. “त्या ताई कोण? त्यांना मी ओळखत नाही. मी एकनाथ शिंदेंना सांगतो, त्या बिचाऱ्या पागल झाल्या आहेत, त्यांना आवरा,” असं निलेश मुनी म्हणाले. धर्मसभेच्या मुख्य वक्त्यांपैकी एक असलेल्या कैवल्य रत्न महाराजांनी यावेळी बेताल वक्तव्य केली. ते म्हणाले, “कबूतर शांतता प्रिय पक्षी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणाला अडवण्यासाठी जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळं पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीरामांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको,” असं ते म्हणाले. कबुतरखान्यामुळं होणाऱ्या आजारांच्या दाव्यांवर त्यांनी डॉक्टरांना ‘मूर्ख’ म्हटलं. “मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं? दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही,” असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “मंत्री मंगलप्रभात लोढा आज धर्मसभेत आले नाही, ही सरकारची मिलीभगत आहे,” असा आरोप देखील त्यांनी केला.
जैन मुनी सुरेशजी महाराज म्हणाले की, “कबूतर हा एक पक्षी आहे आणि त्याची हत्या झाली म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं आहे.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की “कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा.” याचबरोबर, स्वरूपानंदजी महाराजांनीही सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, “आमच्यामध्ये एक गोष्ट मानली जाते, आमच्या प्राण्यांवर जर हल्ला झाला, तर आम्ही त्याला उत्तर देतो. मग आमच्या प्राण्यांना वाचवण्यासाठी शस्त्र उचलावी लागली तरी चालतील,” असं सुरेशजी महाराज म्हणाले. तसंच “यांना सत्तेत साधूसंतांनी बसवलं. आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यामुळं कबुतरांचा प्रश्न सुटला नाही, आम्ही साधूसंत रस्त्यावर उतरू,” असा इशाराही त्यांनी दिला. जैन समाजाच्या प्रतिनिधींनी या सभेत कबुतरांमुळं आजार होतात, असा पुरावा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. “कबुतरांमुळं आजार होतो, असा पुरावा आतापर्यंत कधीही समोर आलेला नाही. याऊलट कबुतराच्या विष्ठेमुळं मूत्रपिंड साफ होते. त्यामुळं पक्षांवर महापालिका आयुक्त अन्याय करत आहेत,” असं निलेश मुनी म्हणाले. तसंच कबुतरखान्याच्या वादाला विकासकामांच्या मागे षडयंत्र असल्याचा आरोप करत, “एवढ्या वर्षांपासून कबूतरखाने असतानाही यावर कधी प्रश्न निर्माण झाला नाही आणि आताच प्रश्न निर्माण होतोय. याचा अर्थ त्याठिकाणी आजूबाजूला कोणालातरी डेव्हलपमेंट करायची आहे. नवीन ठिकाणी कबुतरखाना हलविण्यासाठी हा काही एसआरए प्रोजेक्ट आहे का? या वादाची किंमत आगामी महापालिका निवडणुकीत सरकारला मोजावी लागेल”, असा इशारा निलेश मुनी यांनी दिला.