पुणे : बारामती तालुक्यातील जळोची, एमआयडीसी परिसरात झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेत सहभागी असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. कोयत्याने जीवघेणा हल्ला करून दहशत माजवणाऱ्या या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जळोची, एमआयडीसी रोडवरील जय शंकर पॉन शॉप समोर ही घटना घडली. फिर्यादी जय शंकर पॉन शॉप येथे थांबले असताना मोटार सायकल वरून सहा इसम आले. यातील आरोपी जयेश बाबासाहेब माने (वय २०), प्रथमेश बाळू गवळी (वय २०), विनोद गणेश जाधव (रा. तांदुळवाडी, बारामती) आणि इतर चार अनोळखी साथीदार यांनी फिर्यादीला ‘तु गणेश वाघमोडे सोबत का फिरतोस..?’अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपी प्रथमेश गवळी याने हातातील कोयत्याने फिर्यादीवर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी ‘आम्ही येथील भाई आहोत’ असं म्हणत जागेवरून पलायन केलं.
अटक आरोपी जयेश माने हा गणेश धुळा बापू वाघमोडे हत्येच्या प्रकरणातील आरोपी असून, ऑगस्ट २०२४ मध्ये बारामती शहरात त्याने साथीदारांसह वाघमोडेचा खून केला होता. त्यात तो अटक होऊन जेलमध्ये होता व दीड महिन्यापूर्वीच त्याची सुटका झाली होती. या दोन्ही टोळ्यांमध्ये जुलै २०२३ मध्येही हिंसक वाद झाला होता. त्यावेळी जयेश माने याला मारहाण झाली होती व या घटनेत गणेश वाघमोडे, गौरव सुळ यांच्यावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी जयेश माने आणि प्रथमेश गवळी हे अहिल्यानगर येथील रूई छत्तीशी गावात लपून बसले आहेत. पोलिसांनी तातडीने छापा टाकत दोन्ही आरोपींना अटक केली.