पालघर : विक्रमगड पोलिसांनी अवैध मद्य (दारू) वाहतुकीवर टाकलेल्या धाडीत तब्बल ११ लाखांचा दमण निर्मित बनावट मद्यासाठा तसेच २२ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा मिळून ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ नोव्हेंबर सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास तलवाडा मार्गावर करण्यात आली आहे. याबाबत विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात सीमेजवळून मोठ्या प्रमाणात दमन बनावटीची दारू राज्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विक्रमगड तालुक्यातील दादडे हद्दीत सापळा रचला. संशयित वाहन अडवून तपासणी करण्यात आली, यावेळी दमण बनावटीचा विविध मद्याचे ३९५ खोके आढळून आले. हा जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत सुमारे ११ लाख २० हजार ४०० असल्याचे पोलिसांनी सांगितले.टेम्पोचा चालक पोलिसांना पाहताच पळून गेला. मात्र वाहन ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.







