मुंबई : राज्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र मालकीची कायदेशीर नोंद आणि ‘सातबारा’च्या धर्तीवर ओळख मिळावी यासाठी राज्य सरकारने ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करत या उपक्रमामुळे राज्यातील सुमारे ७ कोटी फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. या प्रणालीअंतर्गत प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येणार असून, त्यात मालकी हक्क, क्षेत्रफळ, कर्ज, गहाणखत आणि इतर दायित्वांची अधिकृत नोंद असेल.
राज्य सरकारने यासाठी ‘महाराष्ट्र जमीन महसूल (इमारतीतील युनिट्सच्या अधिकार अभिलेख व नोंदवह्यांची तयारी आणि देखभाल) नियम, २०२६’ प्रस्तावित केले आहेत. प्रथम संपूर्ण इमारतीसाठी मुख्य प्रॉपर्टी रेकॉर्ड तयार केला जाईल आणि त्यानंतर प्रत्येक फ्लॅट किंवा युनिटला स्वतंत्र ओळख क्रमांकासह स्वतंत्र नोंद दिली जाईल. या नोंदीत फ्लॅट क्रमांक, मालकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, मालकी हक्क, गहाण कर्ज, थकबाकी आणि इतर दायित्वांचा तपशील असेल. मंजूर बांधकाम आराखडे, भोगवटा प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे ही माहिती नोंदवली जाईल. पुनर्विकास किंवा पुनर्बांधणी झाल्यास नवीन मंजूर आराखड्यानुसार नोंदी अद्ययावत करण्यात येतील. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार असून, फ्लॅटधारकांना एटीएम कार्डप्रमाणे वापरता येईल असे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणे, महारेरा आणि भूमी अभिलेख विभाग यांचे डिजिटल एकत्रीकरण करण्यात येणार आहे. फ्लॅटवरील बँक कर्ज, गहाणखत, मालमत्ता कर, सोसायटीची थकबाकी किंवा न्यायालयीन निर्बंध यांची नोंद थेट प्रॉपर्टी कार्डवर दिसणार आहे. अधिकृत बांधकाम असलेल्या प्रकल्पांनाच हे कार्ड देण्यात येणार असून, अनधिकृत बांधकामे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. मसुदा नियमांवर ३० दिवस हरकती व सूचना मागवण्यात येणार असून, त्यानंतर प्रायोगिक अंमलबजावणीनंतर ही प्रणाली टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे.

