मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आंतरराष्ट्रीय फूड चेन्सविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर धडक तपासण्या करण्यात येत असून, अनेक ठिकाणी अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळल्यामुळे दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब, कुलाब्यातील मॅकडोनाल्ड्ससह राज्यातील एकूण १३ आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय ७१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, एकूण ८९ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची अचानक तपासणी करण्यात आली. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही. दक्षिण मुंबईतील रेडिओ क्लबमध्ये १९ ऑगस्ट रोजी झालेल्या तपासणीत नियमांचे तब्बल ४७ टक्के उल्लंघन झाल्याचे आढळले. स्वयंपाकघरात जिवंत माशा, मेलेली झुरळे, छतावरील रंग आणि प्लास्टर अन्नावर पडत असल्याचे दिसून आले. अन्न शिजवण्याच्या जागेजवळ धुण्याची पावडर आणि इतर रसायने ठेवण्यात आली होती, तर खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवले जात होते. कचऱ्याचे डबे स्वयंपाकाच्या चुलीजवळ उघडे ठेवण्यात आले होते. या सर्व गंभीर त्रुटींमुळे रेडिओ क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून, निलंबनाच्या कालावधीत कोणतेही अन्न तयार करणे, विक्री करणे किंवा वाटप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कुलाब्यातील मेट्रो हाऊसमधील मॅकडोनाल्ड्स आउटलेटमध्ये यापूर्वी दिलेल्या नोटीसमधील २० पैकी १८ गंभीर त्रुटी कायम असल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांनी घाणेरडी पादत्राणे आणि कपडे हाताळल्यानंतर हात न धुता तयार अन्नपदार्थ हाताळल्याचे निरीक्षणात दिसून आले. तसेच, अस्सल चीज आणि पनीर वापरण्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात नॉन-डेअरी सॉसचा वापर होत असल्याची बाबही समोर आली. या सर्व कारणांमुळे या आउटलेटचाही परवाना निलंबित करण्यात आला. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रसिद्ध ब्रँड असो किंवा स्थानिक हॉटेल, अन्न सुरक्षा नियमांचे पालन सर्वांसाठी समान आहे.
राज्यातील इतर भागांतही FDA ची कारवाई तितक्याच वेगाने सुरू असून पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, अमरावती आणि मुंबईतील अनेक आस्थापनांवर कठोर पावले उचलण्यात आली आहेत. पुण्यातील बावधन येथील केएफसीच्या साठवणूक केंद्राकडे आवश्यक अन्न सुरक्षा परवाने नसल्याचे आढळले. तसेच वातानुकूलित यंत्रणा निकामी झाल्यामुळे अन्नसाठ्यावरील डब्यांवर पाणी आणि बर्फ साचल्याचे दिसून आले. त्यामुळे या केंद्रासह आणखी ४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. मुळशी येथील बाबाज् किचनमध्ये अनधिकृत खाद्यरंगांचा वापर आणि शिळे अन्न आढळले, तर हिंजवडी परिसरातील काही हॉटेल्समध्ये झुरळे आणि अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. छत्रपती संभाजीनगरमधील ‘छप्पन भोग थाळी’ रेस्टॉरंटमध्ये ज्वारी आणि बाजरीच्या पिठात जिवंत किडे आढळले. तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांनी हाताने किडे काढून तेच पीठ वापरण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचे कोणतेही वैध अहवाल उपलब्ध नसल्याचेही आढळले. मालाडमधील नोवारा, नरिमन पॉईंट येथील स्टेटस रेस्टॉरंट, खार जिमखाना तसेच नागपूर, नाशिक आणि अमरावतीतील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली आहे. FDA ने सर्व आस्थापनांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला भविष्यात कोणतीही मुभा दिली जाणार नाही. राज्यभर सुरू असलेल्या या विशेष मोहिमेमुळे खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अनेक ठिकाणी स्वच्छता, अन्न साठवणूक आणि कर्मचारी प्रशिक्षणाबाबत तातडीने सुधारणा करण्यास सुरुवात झाली आहे. FDA ची ही कारवाई पुढील काळात आणखी व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






