मुंबई : चुनाभट्टी येथील निर्जनस्थळी नेऊन दहा वर्षांच्या मुलावर तिघांनी त्याच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. अल्पवयीन आरोपींची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, तर १८ वर्षीय तरूणाला याप्रकरणी अटक केली आहे. आरोपींविरोधात अपहरण व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ११५(२) व ३(५) सह पोक्सो कायदा कलम ६ व १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित मुलगा व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे त्याला फसवून आरोपींनी चुनाभट्टी येथील निर्जनस्थळी नेले. तेथे तिघांनी अल्पवयीन मुलावर अत्याचार केला. याप्रकरणी मुलगा परत आल्यानंतर त्याच्या आईने त्याच्याकडे विचारणा केली असता घडलेला प्रकार त्याने आईला सांगितला. त्यामुळे आई घाबरली व तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला व तात्काळ स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस पथक पाठवून १८ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. तर उर्वरीत दोन आरोपी १३ व १६ वर्षांचे आहेत. त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पीडित मुलगा व आरोपी एकमेकांचे परिचित आहेत. तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आहे.







