मुंबई : राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी कायमस्वरूपी स्क्रीन राखून ठेवावी आणि तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील असे १०० ते १५० रुपयांदरम्यान ठेवावेत या प्रमुख मागणीसह चित्रपट संघटनेच्या मागण्यांसंदर्भात मंगळवारी गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. संघटनेने केलेल्या मागण्या मान्य केल्या जातील, असे संकेत मिळाल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला पोलिस महानिरीक्षक, मनसे नेते अमेय खोपकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, बाबासाहेब पाटील, सुशांत शेलार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराज भोसले आदी चित्रपटसृष्टीतील प्रतिनिधी तर मल्टिप्लेक्स मालक व प्रतिनिधी म्हणून मयांक श्रॉफ, पुष्कराज चाफळकर, थॉमस डिसूजा आणि राजेंद्र जाला उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये राज्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणाबाबतही सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य देणे, तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवणे, तसेच नवीन धोरण व्यावहारिक आणि उद्योगहिताचे असावे याबाबत विस्तृत चर्चा झाली. विशेषतः प्रत्येक मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी किमान एक स्क्रीन कायमस्वरूपी राखून ठेवणे या मागणीवर चित्रपट निर्मात्यांनी आग्रही भूमिका घेतली. बैठकीबाबत बोलताना सुशांत शेलार यांनी सांगितले की, मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये चार स्क्रीन असतील तर त्यामधील एक स्क्रीन कायमस्वरूपी मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवावा, त्याचबरोबर मराठी चित्रपटांची हिंदी चित्रपटांची तुलना न करता किमान एक आठवडा तरी मराठी चित्रपट थिएटरमध्ये ठेवावा, मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांचे दर कमी करावेत, अशी आम्ही मागणी केली. या बैठकीनंतर सकारात्मक अंमलबजावणी होईल, असा विश्वास वाटतो, असेही ते म्हणाले.







