मुंबई : मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले असताना आता विलेपार्ले येथील टिळक विद्यालयाला धमकीचा ई-मेल आला आहे. शाळा आरडीएक्सने उडविण्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली होती. याबाबतचे वृत्त समजताच सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. शोधसत्र राबविण्यात आले. मात्र शाळेत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी गोवंडी आणि कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोट घडवून आण्याचे ई-मेल प्राप्त झाले होते.शाळेच्या ई-मेल आयडीवर बुधवारीा पहाटे ४.३० च्या सुमारास हा ईमेल प्राप्त झाला होता. हा प्रकार शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्य सुरक्षा अधिकारी संजय तोणपी यांनी स्वतः मुबंई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून धमकीच्या ई-मेलची माहिती दिली. आरोपीने शाळा आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी ई-मेलमध्ये दिली होती. याबाबत माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शाळेची तपासणी केली. मात्र तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. खोडसाळपणाने हा ई-मेल करण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी मुबंई पोलीस अधिक तपास करीत आहेत. नाखिरान डॉट गोपाळ या ई-मेल आयडीवरून हा ई-मेल प्राप्त झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही मुंबई व परिसरातील अनेक शाळांना अशाप्रकारे धमकीचे ई-मेल आले आहेत. पालक व विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन यापूर्वीच पोलिसांकडून करण्यात आले आहे.





