पुणे : पुणे शहरातील काही भागात चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यात महिलांसारखा वेष परिधान करून रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत चोरी करण्यात आली होती. या ठिकाणाहून तब्बल दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचा बंडल चोरी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना दोन सराईत चोरट्यांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्याच्या रामटेकडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या हारको ट्रान्सफॉर्मर कंपनीत २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री खिडकीचा गज तोडून कंपनीत आत मध्ये प्रवेश करून ही चोरी झाली होती. दरम्यान या प्रकरणी अमन अजीम शेख (वय २४), मुसा अबू शेख (वय २४, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपीकडून दोन लाख १९ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांनी कंपनीच्या खिडकीचा गज तोडून आत प्रवेश केला. या चोरट्यांमधील एका चोरट्याने पिवळा गाऊन, तर दुसऱ्याने गुलाबी रंगाची सलवार कमीज परिधान केली होता. त्यानंतर तोंडाला ओढणी व स्कार्फ बांधून कंपनीतील खोलीतून तांब्याच्या तारांचे बंडल व पट्ट्या चोरून पोबारा केला. कंपनी मालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी वानवडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. यात चोरट्यांनी महिलांसारखा वेश परिधान केल्याचे उघडकीस आले. याचा तपास करताना दोन्ही चोरटे पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली दिली असून तांब्याच्या तारा, पट्ट्या, हार्ड डिस्क असा दोन लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी श्री. मनोज पाटील,अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. डॉ.राजकुमार शिंदे सो, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५, श्री. धन्यकुमार गोडसे सो, सहाय्यक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सत्यजित आदमाने, श्री.विजयकुमार डोके पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकाचे सपोनि उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाने,अमोल गायकवाड, अभी चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, यतीन भोसले, विठ्ठल चोरमले,आशिष कांबळे, अर्शद सय्यद यांनी केली आहे.







