मुंबई : मागील काही दिवसात दादरमधील कबुतरखान्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत राहिला. महापालिकेने हा कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजातील काही लोकांनी या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले. तसेच नवीन कबुतरखाना सुरु होणार का? असे प्रश्न देखील उपस्थित होत होते. आज अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. नुकतेच मुंबईतील नॅशनल पार्क येथे नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याहस्ते करण्यात आले. नॅशनल पार्क येथील जागेत हा कबुतरखाना बांधण्यात आला असून या कबुतरखान्याचा त्रास कोणाला होणार नाही, असा आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्य म्हणजे, स्थानिक रहिवाशांचे हित जपून प्रत्येक वॉर्डात नवे कबुतरखाने सुरु करण्याचा मानस असल्याचे लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबईतील कबुतरखान्याचा प्रश्नावरुन काही दिवसांपूर्वी राजकीय वाद पेटला होता. त्यातच ही लढाई न्यायालयात सुद्ध गेली होता. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारतर्फे समितीची घोषणा करण्यात आली होती. कबुतरखान्याबाबत वाद सुरु झाल्यानंतर मुंबईतील नॅशनल पार्कसारख्या ठिकाणी कबुतरखाना हलविण्यात यावा, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. अखेर रविवारी जैन समाजाच्या मदतीने या ठिकाणी नव्या कबुतरखान्याची निर्मिती करण्यात आली असून त्याचे उद्घाटन मंत्री लोढा यांच्याहस्ते पार पडले.







