मुंबई : सागरी किनारा मार्गावर विशेष संगीत पट्ट्या तयार करण्यात आल्या असून या मार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या संगीत रस्त्याला अर्थात मेलडी रोडला ब्रीच कॅण्डीच्या रहिवाशांनी विरोध केला आहे. सतत वाजणाऱ्या गाण्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार या रहिवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे व पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर अर्थात मुंबई कोस्टल रोडवर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे (रंब्लर्स) बसविण्यात आले आहेत. संगीत मार्गावरील (मेलोडी रोड) पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकू येते. रस्त्यावरून ठराविक वेगाने (६० ते ८० किमी/तास) गाड्या गेल्यास टायरच्या घर्षणामुळे ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू येते. मात्र, ब्रीच कँडी आणि वरळी परिसरातील रहिवाशांच्या मते, हे संगीत पहाटे ६ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत सतत वाजत असल्याने त्यांना प्रचंड ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत आहे. जवळच राहणाऱ्या ६५० हून अधिक कुटुंबांनी या आवाजाबाबत तक्रार केली आहे. घरातील खिडक्या बंद करूनही हा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो, ज्यामुळे वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत आहे. ब्रीच कँडी रेसिडेंट्स फोरमने (BCRF) या आवाजाविरोधात महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO) पत्र पाठवून हा प्रयोग तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.






