नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकच्या बाहेर पार्किंगमध्ये एक कार उभी होती. याच कारमध्ये हा मोठा स्फोट झाला आहे. स्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. लोकांनी घटनास्थळी जात गर्दी केली. स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा स्फोट नेमका कशामुळे झालाय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. हरियाणातील फरिदाबादमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी नुकतेच एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत. सोबतच या डॉक्टरकडे दोन एके-४७ बंदुका असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ३०० किलो आरडीएक्स पकडण्यात आलेले आहे. असे असतानाच आता दिल्लीत कारमध्ये स्फोट झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का? ते अद्याप समजू शकलेलं नाही.
एका इको व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ही स्फोटाची घटना घडली. स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली. या आगीत अनेक गाड्या आगीच्या भक्षस्थानी गेल्या. या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा स्फोट खूप भीषण होता. परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहे. एवढंच नाही तर काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव अस्ताव्यस्थ पडलेली बघायला मिळत आहेत. या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेमागे नमकं कारण काय आहे? हा दहशतवादी हल्ला होता की दुसरं काही होतं? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. घटनास्थळी डॉग स्कॉडच्या मदतीने तपास केला जात आहे. या स्फोटात आतापर्यंत ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने एलएनजीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा स्फोट इतका मोठा होता की, त्याच्या आवाजाने परिसरातील दुकानांची काचे फुटली. तसेच अनेक वाहनांच्या देखील काचा फुटल्या होत्या. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटना पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी मोठा गोंधळ उडालेला होता. अखेर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिस्थिवर नियंत्रण मिळवले. संबंधित परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, की जवळपासच्या दुकानांचे दरवाजे आणि खिडक्या फुटल्या आणि परिसरातील घरे देखील हादरले आहेत. आता पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे.







