मुंबई : भारतीय दूरचित्रवाणी विश्वाला CID आणि आहटसारख्या गाजलेल्या मालिका देणारे ज्येष्ठ निर्माते व दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचे २७ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली. CID मालिकेच्या संपूर्ण टीमसह चाहत्यांनाही हा मोठा धक्का बसला आहे. या दुःखद प्रसंगी CID मधील एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते शिवाजी साटम यांनी आपल्या भावना व्यक्त करत बी. पी. सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सांगितले की, आपल्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे धडे बी. पी. सिंह यांनीच दिले. नाटकातून आलेल्या स्वतःला कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्याची शैली त्यांनी शिकवली आणि प्रत्येक प्रसंग अधिक प्रभावीपणे साकारण्याची कला त्यांनीच आत्मसात करून दिली.
शिवाजी साटम यांनी बी. पी. सिंह यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आठवणींनाही उजाळा दिला. “ते केवळ दिग्दर्शक नव्हते, तर आयुष्यभराचे मित्र आणि उत्तम गुरू होते. आमच्यात मतभेद झाले, भांडणं झाली; पण आमचं नातं कधी तुटलं नाही. ते माझ्या प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत उभे राहिले,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, बी. पी. सिंह यांच्यासारख्या व्यक्तीला पद्मश्रीसारखा सन्मान मिळायला हवा होता. मात्र, त्यांनी कधी पुरस्कारांचा विचार केला नाही. “प्रेक्षकांचे प्रेम हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे,” असे ते नेहमी म्हणायचे, अशी आठवणही साटम यांनी सांगितली. १९९८ मध्ये सुरू झालेल्या CID मालिकेने तब्बल १,६५१ भागांचा टप्पा गाठत भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासात वेगळी ओळख निर्माण केली. २०१८ मध्ये मालिका संपल्यानंतर २०२४ मध्ये तिचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. बी. पी. सिंह यांच्या निधनाने भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्रातील एका युगाचा अंत झाल्याची भावना कलाकार आणि चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

