पुणे : तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण योजनेंतर्गत २०२३-२४ या वर्षात अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात आली. कारागृहातून कैद्याने पलायन करू नये, तसेच या कैद्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून आता अद्ययावत प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात येरवडा मध्यवर्ती आणि महिला कारागृहात बायोमेट्रिक, पॅनिक अलार्म आणि सार्वजनिक संबोधन प्रणाली बसविण्यात आली आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील इन्व्हेडर टेक्नॉलॉजीज कंपनीमार्फत ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) प्रशांत बुरडे, डॉ. जालिंदर सुपेकर आणि कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. ही प्रणाली टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर कारागृहांमध्येही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, इन्व्हेडर टेक्नॉलॉजीज कंपनीचे शशांक मिश्रा, अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम, उपअधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, आर. ई. गायकवाड, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए. एस. कांदे, तुरुंगाधिकारी शिवाजी पाटील, सी. आर. सांगळे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
असा होणार फायदा
१) बायोमेट्रिक प्रणाली
– कारागृहात नियंत्रित प्रवेश बंदी, कर्मचारी आणि अभ्यांगतांच्या हालचालींवर लक्ष
– कारागृहात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश
– कैद्यांचे पलायन टाळण्यासाठी त्यांच्या हालचालींवर लक्ष
– कारागृहात भेटीसाठी येणाऱ्या अभ्यांगतांचे स्क्रिनिंग होणार
२) पॅनिक अलार्म बटण
– आपत्कालीन परिस्थितीला जलद प्रतिसाद देण्यासाठी पॅनिक अलार्म बटणाचा वापर
– दंगल किंवा हिंसाचारावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यासाठी पॅनिक बटण
– कैद्यांना वैद्यकीय मदतीसाठी तातडीने सूचना पाठविण्याची सुविधा
– कैद्यांकडून पलायनाचा प्रयत्न किंवा इतर अनुचित प्रकार वेळेत रोखता येणार
– सायलेंट अलार्म प्रणालीमुळे अधिकाऱ्यांना गुप्त सूचना मिळणार
३) सार्वजनिक संबोधन प्रणाली
– कारागृहामध्ये प्रभावी संवाद, सुरक्षा आणि व्यवस्थापन
– अधिकाऱ्यांना घोषणा करण्यास आणि कैद्यांच्या वर्तनावर लक्ष





