पुणे : शिवाजीनगर न्यायालयासमोर भरदिवसा कोयत्याने हल्ला आणि गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी, “सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम करता येत नाही. पुण्याला कडक पालकमंत्री द्यावा किंवा सुनेत्रा पवार यांना अधिक अधिकार द्यावेत,” असे वक्तव्य केले. २०२५ मधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळेवर न्यायालय परिसरात झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. “अजित पवार यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. सुनेत्रा पवार यांचा आवश्यक तितका वचक जाणवत नाही. पोलीस आयुक्तही कोणाचे ऐकत नाहीत, असे चित्र दिसते,” असे म्हणत त्यांनी प्रशासनावरही अप्रत्यक्ष टीका केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्री झाल्यास परिस्थिती अधिक बिघडेल, असेही त्यांनी म्हटले.
रोहित पवार यांच्या वक्तव्यावर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी अशा प्रकारची टिप्पणी करणे अयोग्य असल्याचे सांगितले. “सुप्रिया सुळे या अनुभवी नेत्या असून त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. मात्र काही लोक केवळ टीका करण्यासाठीच वक्तव्ये करत आहेत,” असे बावनकुळे म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार नाहीत आणि सुनेत्रा पवार सध्या पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. रोहित पवार यांची टीका ही राजकीय हेतूने प्रेरित असून ती योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, शिवाजीनगर न्यायालय परिसरातील हल्ल्यानंतर पुण्यातील सुरक्षाव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिक तीव्र झाले असून या मुद्द्यावर आगामी काळातही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

