पुणे : २०२४-२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करत एकूण ३ लाख ४० हजार रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. पुणे विभागाच्या अंतर्गत असलेल्या १४ आगारांमधून एसटीने केलेल्या तपासणी मोहिमेत ३१९ फुकट्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे. विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मूळ तिकिटाच्या रकमेबरोबर त्याच्या दुप्पट दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यावर १८ टक्के जीएसटीही लागू होतो. शिवाय प्रवाशांकडे जर इतर सामान असल्यास, त्याचे शुल्कही स्वतंत्रपणे वसूल करण्यात येते.
भाडे वसूली : ४६,५५० रुपये,
दंड : ८३,१८७ रुपये
इतर वसूली : २,१०,४९७ रुपये
एकूण : ३,४०,२३४ रुपये
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बिघडत्या आर्थिक स्थिती लक्षात घेत राज्य सरकार आता त्यात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोमवारी (२३ जून) एक सविस्तर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार आहेत, ज्यामध्ये महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती, तोटा, महसूल, खर्च, थकीत कर्जे आणि प्रलंबित देयके यांची संपूर्ण माहिती देण्यात आली. या श्वेतपत्रिकातून केवळ परिस्थिती सार्वजनिक होणार नाही तर महामंडळाला संकटातून बाहेर काढण्यासाठी संभाव्य उपाय देखील सुचवले जाणार आहेत.





