मुंबई : दोन दिवसांपूर्वी मी मराठीत बोलणार नाही, असे डोळे वटारून सांगणाऱ्या घाटकोपरमधील मुजोर विक्रेत्या महिलेने अखेर माफी मागितली असून मराठीत बोलणार असे तिने सांगितले. तिच्या मग्रुरीची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर घाटकोपरमधील स्थानिक शिवसेनेच्या (ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यांनी तिला जाब विचारला. त्यानंंतर तिनेही माफी मागितली.
सध्या राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद सुरू आहे. मनसे आणि शिवसेनेने (ठाकरे) या मुद्द्यावरून चांगलेच रण पेटवले आहे. मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांना चोप देऊन धडा शिकवला जात आहे. यामुळे मराठी भाषिक एकवटत असून दुसरीकडे काही हिंदी भाषिक हेतुपरस्सर मराठी भाषकांना डिवचत आहेत. दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथील एका परप्रांतीय विक्रेत्या महिलेची चित्रफित व्हायरल झाली होती. मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोलणार असे सांगत होती. ती मराठी भाषकांना उद्देशून हे बोलत होती. यामुळे मराठी भाषिक कमालीचे दुखावले होते. मात्र या महिलेला शिवसेनेच्या (ठाकरे) स्थानिक महिलांनी मंगळवारी रात्री चांगलाच धडा शिकवला. महिलांनी तिच्या दुकानात जाऊन जाब विचारला. यामुळे ती परप्रांतीय महिला चांगलीच नरमली. तिने माफी मागितली आणि यापुढे मराठीच बोलणार असे सांगितले. महिलांनी तिला ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा देण्यासही सांगितले. यापुढे कुणी असा प्रकार केला तर चांगलीच अद्दल घडवली जाईल, असेही शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी सांगितले.







