पुणे : डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. पुण्यात यंदा डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर डास निर्मूलनाचे पारंपरिक उपाय अपुरे पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुण्यातील संशोधकाने ड्रोनच्या साहाय्याने डास शोधून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञाधारित (एआय) ‘स्मार्ट सर्व्हिलन्स’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचा वापर महापालिकेने करावा, यासाठी त्याने प्रस्तावही सादर केला आहे.
डॉ. केदार देवभानकर असे या संशोधकाचे नाव आहे. ते रॉस लाइफसायन्सेस लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी कृत्रिम प्रज्ञाधारित ‘स्मार्ट सर्व्हिलन्स’ तंत्रज्ञानाचा प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मांडला आहे. आरोग्य विभागाने पथदर्शी प्रयोग म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर ठरावीक भागात करावा, असा त्यांचा प्रस्ताव आहे. यासाठी येरवडा-कळस-धानोरी, ढोले पाटील रस्ता आणि घोले रस्ता या तीन क्षेत्रीय कार्यालयांची नावे सुचविण्यात आली आहेत. कारण या क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात झोपडपट्टी परिसर आणि खुले नाले अधिक आहेत. त्यामुळे तिथे डासांचा प्रादुर्भाव अधिक असून, पर्यायाने कीटकजन्य आजारांचा प्रसारही जास्त आहे. पुण्यात डासांचा जास्त प्रादुर्भाव असलेला १० चौरस किलोमीटर भागातील एक विभाग पथदर्शी प्रकल्पासाठी निवडला जाईल. त्यानंतर तिथे स्मार्ट सर्व्हिलन्स सुरू होईल. त्यात ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने साचलेल्या पाण्याचे साठे शोधले जातील. त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या भागातील डासांचा शोध घेतला जाईल. डास सापडल्यानंतर हे ड्रोन तिथे कीटकनाशकांची फवारणी करतील. त्यात रासायनिकऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर केला जाईल. हे फवारणीचे चक्र दर १५ दिवसांनी तीन महिन्यांसाठी सुरू राहील, अशी माहिती डॉ. देवभानकर यांनी दिली.







