मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध आणि इतिहासाशी साक्ष देणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी पोस्ट केला होता. आता त्याच पार्टीमधील इतर काही फोटो सामोर आले आहेत.
या फोटोजमध्ये लोकांच्या हातात बिअरचे कॅन दिसून येतायत. ठाकरे गट या प्रकरणावर चांगलाच आक्रमक झाला असून स्थानिक आमदार आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनाही अखिल चित्रे यांनी सुनावले आहे. गडकिल्ल्यावर दारू पार्टी होत असताना सरकार कुठे आहे? सरकारची काही सुरक्षा यंत्रणा व्यवस्था आहे की नाही? सरकार काय झोपले आहे का? असा प्रश्नांची सरबत्ती शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी केली. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम वांद्रे किल्ल्यावर दाखल झाली आहे. पोलीस सीसीटीव्ही तपासत असून किल्ल्यावर दारू पार्टी करणाऱ्या तरुणांचा शोध घेतला जात आहे. दोषींना लवकरच पकडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.







