मुंबई : महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सुरक्षित, सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एअर ॲम्ब्युलन्स तसेच रुग्णवाहिका सेवांसाठी स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी राज्य सरकारने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती दिली. अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली असून, परिवहन, सार्वजनिक आरोग्य आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत समितीला सविस्तर अहवाल आणि आवश्यक शिफारशी राज्य सरकारकडे सादर कराव्या लागणार आहेत. या समितीच्या माध्यमातून राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे अधिक परिणामकारक नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वय वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स आणि आधुनिक रुग्णवाहिका सेवांचे कार्य अधिक सुसूत्र, सुरक्षित आणि जलद करणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करणे होय. विशेषतः समृद्धी महामार्गासह राज्यातील प्रमुख महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती निश्चित करण्यावर समिती भर देणार आहे. यापूर्वी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी एअर ॲम्ब्युलन्स आणि रुग्णवाहिका सेवांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता सात सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून, तिच्या शिफारशींनंतर राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये अधिक वेग, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
