नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गुरुवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मित्र भेटीला आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एकाच कारमधून प्रवास केला.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं दिल्लीच्या पालम विमानतळावर सायंकाळी आगमन झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर जात त्यांचं स्वागत केलं. या भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन हे पंतप्रधान मोदींसोबत व्यापार, अर्थव्यवस्था, संरक्षण आणि गुंतवणूक यावर चर्चा करणार आहेत. आज संध्याकाळनंतर, पंतप्रधान मोदी पुतिन यांच्यासाठी एक खासगी डिनर आयोजित करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्यासाठी राजकीय मेजवानी आयोजित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक असणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा अधिकृत दौरा 5 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील. राष्ट्रपती भवनातून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे राजघाट इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि इतर स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी जातील. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे हैदराबाद हाऊस भेट देणार आहेत. या शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दोन देशातील व्यापर करारावर चर्चा करतील. यात कच्च्या तेलाबाबतचा करार, एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी आणि मुक्त व्यापार करार (FTA) आदी करारावर चर्चा करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे रशियाकडं प्रयाण करतील.







