मुंबई : मुंबईच्या पवई भागात १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना रोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही त्याच्यावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या पवई भागातील एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य याने १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं. यानंतर पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत या मुलांची सुटका केली आहे. पोलिसांनी बाथरूममधून मुलांना ओलिस ठेवलेल्या ठिकाणी प्रवेश केला. मुलांची सुटका करत असताना पोलिसांना गोळीबारही करावा लागला. ही घटना पवईमधल्या आरए स्टुडिओमध्ये घडली, जिथे अभिनयाचे वर्ग नियमितपणे घेतले जातात. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव रोहित आर्य असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित आर्य हा स्टुडिओमधलाच कर्मचारी आहे आणि तो एक युट्युब चॅनलही चालवतो. मागच्या चार ते पाच दिवसांपासून रोहित परिसरात ऑडिशन्स घेत होता. गुरूवारी सकाळी १०० मुले ऑडिशन्ससाठी आली तेव्हा त्याने ८० मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिली. पण १७ मुलांना आतच कोंडून ठेवले.







