पुणे : इटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल पाठवून पुण्यातील नऱ्हे भागातील एका नामांकित कंपनीची तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. कंपनीची इटलीतील ऑटोमोबाईल कंपनीशी करारानुसार देवाण-घेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ५२ वर्षीय संचालकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सायबर चोरट्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ फेब्रुवारी ते १० जून २०२५ या कालावधीत ही फसवणूक घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या कंपनीचा इटलीतील एका कंपनीशी ऑटोमोबाईल पार्ट्स उत्पादनासाठी मशीन खरेदीचा करार झाला होता. त्यानुसार, ठरलेल्या अटींनुसार काही टप्प्यांमध्ये पेमेंट केले जाणार होते. दोन वेळा पेमेंट प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. मात्र, तिसर्या टप्प्यातील रकमेच्या पेमेंटवेळी सायबर गुन्हेगारांनी इटलीतील कंपनीच्या अधिकृत ई-मेलसारखा नावात साधर्म असलेला बनावट ई-मेल तयार करून पुण्यातील कंपनीशी संपर्क साधला. त्यात यापूर्वी पेमेंट केलेल्या खात्याव्यतिरिक्त दुसरे बँक खाते आणि अधिकार्यांची सही असलेले इन्व्हॉईस पाठवण्यात आले. यावर विश्वास ठेवून कंपनीने नवीन साईटवर तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये ट्रान्सफर केले. युरो चलनामध्ये ही रक्कम पाठविण्यात आली. मात्र, मूळ कंपनीकडून पैसे मिळाले नसल्याचे समजताच फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले.







