ठाणे : गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकात आजपासून दोन अतिरिक्त रेल्वे आरक्षण खिडक्या सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे तिकीट आरक्षणासाठी तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असून, मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशात नोकरी-व्यवसायासाठी वास्तव्यास असलेले लाखो कोकणवासी दरवर्षी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेचा आधार घेतात. यंदा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होत असून, त्यासाठीचे ६० दिवस आधीचे आगाऊ आरक्षण ११ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. या काळात रेल्वे आरक्षण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रवाशांना दीर्घ प्रतीक्षा, रांगा आणि गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यांनी मुंबई मध्य रेल्वेचे प्रबंधक, मुंबईचे महाप्रबंधक तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदने सादर करून गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
खासदार नरेश म्हस्के यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे–सावंतवाडी विशेष ‘धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. यासोबतच सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करणे, अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे आणि ठाणे रेल्वे स्थानकात अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली होती. सध्या सुरू असलेल्या आरक्षण खिडक्यांव्यतिरिक्त किमान दोन नवीन आरक्षण खिडक्या सुरू करण्याच्या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकाजवळील पोस्ट ऑफिससमोर दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली असून, या खिडक्यांचा शुभारंभ शनिवार, ११ जुलै रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. या सुविधेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट आरक्षण अधिक सुलभ होईल, गर्दीचे व्यवस्थापन सुधारेल आणि आरक्षण प्रक्रियेत होणारा वेळ व गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






