नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता आधार कार्ड पडताळणीसाठी सरकारी कार्यालयात जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने ही जबाबदारी भारतीय टपाल विभागाकडे सोपवली असून, पोस्टमन आणि टपाल अधिकारी थेट नागरिकांच्या घरी जाऊन आधार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. या उपक्रमाचा लाभ विदर्भातील २२ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना होणार असून, या मोहिमेची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर नागपूरमधून करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत संबंधित ज्येष्ठ नागरिक प्रत्यक्ष हयात आहेत का, तसेच आधार कार्डावरील फोटो आणि माहिती व्यक्तीशी जुळते का, याची खातरजमा केली जाणार आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांची उपलब्ध वैध कागदपत्रांच्या आधारे घरपोच आधार नोंदणीही केली जाणार आहे. या सेवेसाठी टपाल विभागाकडून आधी नागरिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या सोयीची वेळ निश्चित केली जाईल आणि त्यानुसार कर्मचारी घरी भेट देतील. त्यामुळे वृद्ध, आजारी किंवा घराबाहेर जाणे शक्य नसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मोहिमेअंतर्गत अमरावतीमध्ये १० शतायुषी नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. डाक सेवा विदर्भ विभागाचे संचालक डॉ. सुधीर जाखेरे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळून त्यांना घरबसल्या आधार सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, त्यामुळे विदर्भातील हजारो नागरिकांना आधार पडताळणीसाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

