वृत्तसंस्था : दूरसंचार क्षेत्रात मोठे यश मिळवल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता उपग्रह इंटरनेट क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला थेट स्पर्धा देण्यासाठी रिलायन्स जिओने पृथ्वीच्या निम्न कक्षेत (LEO) तब्बल १,६०० उपग्रहांचे जाळे उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या माध्यमातून भारतासाठी स्वदेशी आणि सक्षम उपग्रह इंटरनेट प्रणाली विकसित करण्यावर कंपनीचा भर असणार आहे. या प्रकल्पासाठी रिलायन्स भारतीय उपग्रह निर्मिती कंपन्या, तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि प्रमुख औद्योगिक समूहांसोबत भागीदारी करण्याबाबत चर्चा करत आहे. तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारीही कंपनीने दर्शवली आहे. कंपनीच्या नियोजनानुसार सप्टेंबर २०२७ मध्ये या प्रकल्पाची चाचणी मोहीम राबवली जाणार असून, २०२८ च्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर उपग्रहांचे प्रक्षेपण सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला २०३० पर्यंत संपूर्ण नेटवर्क उभारण्याची योजना होती; मात्र उपग्रह निर्मिती आणि प्रक्षेपणातील तांत्रिक व औद्योगिक आव्हानांमुळे हा कालावधी वाढवून आता २०३५ पर्यंत करण्यात आला आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून जिओ प्लॅटफॉर्म्स भारतातील दुर्गम भागांसह देशभरात उच्च-गती इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असून, भारताच्या कनेक्टिव्हिटीच्या गरजा पूर्ण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी उपग्रह उत्पादन क्षमतेत मोठी वाढ करावी लागणार आहे. सध्या भारतात दरवर्षी १५ पेक्षा कमी उपग्रहांची निर्मिती होत असताना, रिलायन्सच्या प्रस्तावित नेटवर्कसाठी दरवर्षी सुमारे २०० उपग्रहांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता अनेक पटींनी वाढविण्यासाठी देशांतर्गत तसेच परदेशी कंपन्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. कंपनी अमेरिकेतील किमान ४०० उपग्रह खरेदी करण्याच्या तयारीत असून, त्यासाठी दोन अमेरिकन कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय युरोपमधील काही उपग्रह उत्पादकांचाही विचार केला जात आहे. सध्या स्पेसएक्सच्या स्टारलिंककडे १०,००० हून अधिक उपग्रहांचे जाळे असून, जागतिक उपग्रह इंटरनेट बाजारात त्यांचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत रिलायन्सचे १,६०० उपग्रहांचे नेटवर्क भारतातील उपग्रह इंटरनेट सेवांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करू शकते. या प्रकल्पामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना मिळण्याबरोबरच देशातील उपग्रह उत्पादन उद्योग, अवकाश तंत्रज्ञान आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रातही नवे पर्व सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

