नवी दिल्ली : देशातील पॅकेटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असलेल्या सर्व पॅकेटबंद खाद्यपदार्थांच्या दर्शनी भागावर स्वतंत्र लाल रंगाची चेतावणी चिन्हे लावणे बंधनकारक करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांना दिले आहेत. न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ‘3S अँड अवर हेल्थ सोसायटी’ या सार्वजनिक धर्मादाय संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर हा आदेश दिला. न्यायालयाने ‘फ्रंट-ऑफ-पॅकेज न्यूट्रिशन लेबलिंग’ प्रणाली प्रभावीपणे लागू करण्यावर भर देत, साखर, मीठ आणि फॅट या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र लाल षटकोनी चेतावणी चिन्ह असावे, असे स्पष्ट केले. या चिन्हांवर अनुक्रमे “HIGH SUGAR”, “HIGH SALT” किंवा “HIGH FAT” असा स्पष्ट मजकूर आणि संबंधित प्रतीक असणे आवश्यक आहे. प्रत्येक चिन्हाचा आकार पॅकेटच्या मुख्य दर्शनी भागाच्या सुमारे ४ ते ५ टक्के असावा आणि त्यावरील मजकूर ग्राहकांना सहज वाचता येईल इतक्या मोठ्या अक्षरांत असावा, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच पोषण निकष ठरवताना केवळ ‘ॲडेड शुगर’ऐवजी ‘टोटल शुगर’ आणि फॅटसाठी ‘सॅच्युरेटेड फॅट’ यांचा आधार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ग्राहकांमध्ये पोषणविषयक जागरूकता वाढविण्यासाठी केवळ पॅकेजिंगवरील चेतावणी पुरेशी नसल्याचे नमूद करत शालेय स्तरावर पोषण साक्षरता वाढविण्यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्याचे आणि विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले आहेत. सुरुवातीला FSSAI ने नियम दोन टप्प्यांत लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, नंतर कॅनडाच्या धर्तीवर कोणताही एक घटक निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास त्या उत्पादनावर लाल षटकोनी चेतावणी चिन्ह लावण्याचा प्रस्ताव स्वीकारला. नॉन-कॅलोरिक स्वीटनर्स असलेल्या उत्पादनांसाठी स्वतंत्र चेतावणी देण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या नव्या नियमांचा मसुदा, प्रगती अहवाल आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला १० आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात चिप्स, बिस्किटे, जंक फूड, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि शीतपेय उत्पादक कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या रेसिपी तसेच पॅकेजिंगमध्ये मोठे बदल करावे लागू शकतात. ग्राहकांना उत्पादनातील पोषणमूल्यांची स्पष्ट माहिती मिळावी आणि आरोग्यदायी पर्याय निवडणे अधिक सोपे व्हावे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

