मुंबई : राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांना मोठे वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले आहे. तब्बल १८ वर्षानंतर मनसे नेते राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये मोठे समाधान आणि जल्लोष दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. मागील दोन दशकांपासून राज -उद्धव या भावंडामध्ये असणार वाद आता निवळला आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित आले होते. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. यानंतर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे स्वतः त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत. राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर तब्बल १८ वर्षानंतर मातोश्रीवर दाखल झाले आहेत. हा क्षण मनसे आणि शिवसेनेच्या समर्थकांसाठी अत्यंत भावनिक मानला जात आहे.







