पुणे : पुण्यात पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने आपलं अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या आधारे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतात. परंतु, अनेक प्रवशांना याबद्दल माहिती नसल्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून १ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे. यामध्ये अधिकाधिक प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
पीएमपीच्या प्रमुख बस स्टॉपवर बसच्या आतमध्ये, सीट शेजारी, आणि बाहेर पॅनेवलवर क्यूआर कोड लावले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना हे अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. या अॅपचा वापर करून बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यापासून बसचे रिअल टाइम लोकेशन आणि संपूर्ण वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना सहजपणे मिळते. सध्या २.५ दशलक्षाहून अधिक प्रवासी या अॅपचा वापर करतात. परंतु, ही संख्या प्रवाशांपेक्षा कमी असल्यामुळे अॅपवापर करणाऱ्यांची संख्याही वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पीएमपीचे अध्यक्ष आणि संचालक महेश आव्हाड यांनी याबद्दल माहिती दिली, “Aapli PMPML हा अॅप प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या आधुनिकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सध्या २.५ दशलक्षाहून अधिक प्रवासी अॅपचा वापर करत असून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.” हा अॅप प्रवाशांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सोयीस्कर ठरत आहे. बसची वाट पाहत असतानाच तिकीट बुक केल्यामुळे पुन्हा कंडक्टरवर अवलंबून राहवं लागत नाही. शिवाय प्रवाशांच्या वेळेतही बचत होते. शहरांतील नवीन प्रवाशांना बसच्या वेळापत्रकासह त्यांच्या मार्गांचीही माहिती सहजपणे मिळते. तसेच, बसच्या लाइव्ह ट्राकिंगमुळे घरातून किती वाजता निघाल्यावर कोणती बस मिळेल हे समजणे शक्य होते. या अॅपमुळे पुणेकरांना आपल्या प्रवासाचं योग्य नियोजन करणं शक्य झालं असून प्रवासाच्या वेळेत बचतही होत आहे. एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या या अॅप ड्राइव्हनंतर अॅपवापरकरत्यांची संख्या वाढून पुण्यातील प्रवास अधिक हाय-टेक होईल अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.






