पुणे : पुण्यातील टोळी युद्ध हे राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहे. पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांनी शहरभर उच्छाद घातला असताना पुणे पोलिसांनी या टोळ्यांचे कंबरडे मोडायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला आंदेकर गँग आणि त्यानंतर निलेश घायवळ गँगच्या नाड्या आवळल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या रडारवर मारणे टोळी आहे. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणे हा पोलिसांच्या ताब्यात असून याच टोळीतला गजानन मारणे नंतर दुसरा सर्वात मोठा मेंबर असणारा रुपेश मारणे याला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दीर्घकाळ फरार असलेला गजा मारणे टोळीचा सक्रिय सदस्य रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. कोथरूड पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून त्याला अटक केली. फेब्रुवारी महिन्यात कोथरूड परिसरात झालेल्या घटनेत देवेंद्र जोग या संगणक अभियंत्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. जोग हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.







