पुणे : पुण्यात गाड्यांच्या बाबतीत हौशी कलाकारांची काही कमतरता नाही. याच हौशी गाडी चालकांवर बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यात मॉडिफाइड सायलेन्सर , विदाऊट नंबर प्लेट, अशा एकूण २२ बुलेट गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बुलेट चालक हे सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत असल्या बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर कारवाई करण्यासाठी ४ अधिकारी व १५ अंमलदार यांची पथके तयार करून पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून मोटार वाहन कायद्याच्या कलम २०७ नुसार सुधारित सायलेन्सर बसविलेली २२ बुलेट दुचाकी वाहने ताब्यात घेतले असून सदर गाड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून घेण्यात आले आहेत. फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट ड्रायव्हिंग, विनापरवाना वाहन चालविणे, बुलेट मोटारसायकलवरील अनधिकृत सायलेन्सर सुधारणेसह विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलेट चालकांवर वाहतूक अंमलदार यांचे मार्फत २५०००/- रुपये दंडात्मक कारवाई करून सदर वाहनाचे मूळ सायलेन्सर बसवून तसेच ज्या गाड्यांना नंबर प्लेट नाही अश्या गाड्यांवर कारवाई करून त्यांना नंबर प्लेट बसवून सदरची वाहने वाहन मालक यांचे ताब्यात देण्यात आली आहेत.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या पथकाने केली आहे.





