वृत्तसंस्था : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन १६ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ कालावधीमध्ये पार पडणार आहे. कोर्सच्या आयोजनासाठी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यक्तिमत्व विकास कोर्स चे समन्वयक प्रा.डॉ. रामचंद्र पाखरे यांनी केले. कोर्स संदर्भात माहिती व रूपरेषा विद्यार्थ्यांना सांगितली.कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर पडेल. उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हे कोर्सेस मधून पूर्ण करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल मधील नेतृत्व कौशल्य, टीम वर्क, भाषा कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या गुणांचे महत्त्व वाढण्यास मदत होईल असे सांगितले. प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आत्मसन्मान आवश्यक घटक असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा बनसोडे व आभार डॉ तेजश्री हुंबे यांनी व्यक्त केले.







