नाशिक : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा स्थितीत अमळनेर पोलीसांनी विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या सुमारे १५ लाखांपेक्षा अधिक किमतीच्या २४ दुचाकींसह दोन संशयितांना नंदुरबार जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. हिमंत रेंहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्डे (दोन्ही रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. अमळनेर पोलीसांनी अत्यंत शिताफीने धडगाव परिसरातील डोंगराळ भागात सापळा रचून दोन्ही संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
कसून चौकशी केल्यानंतर दोघांनी अमळनेर तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून असंख्य दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीसांनी त्यांच्या सांगण्यावरून सातपिंप्री येथील जंगल परिसर पिंजून काढत चोरीच्या एकूण २४ दुचाकी हस्तगत केल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकी प्रामुख्याने होंडा यूनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर, हीरो स्प्लेंडर, अशा विविध कंपनींच्या आहेत. आणि त्यांची एकत्रित किंमत १५ लाख ६३ हजार रूपये इतकी आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या गुन्हे क्रमांक ३०८/२०२५, २९९/२०२५ आणि २३३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(दोन) प्रमाणे दाखल चोरीच्या दुचाकींचा शोध सुरु होता. तपासादरम्यान पोलीसांनी सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. या तपासातून चोरी करणारे हिंमत रेंहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्डे (दोन्ही रा. सातपिंप्री) हे चोरटे असल्याचे निष्पन्न झाले.







