वृत्तसंस्था : वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेत असतो. मात्र प्रत्यक्ष मैदानावर हा सामना एकतर्फी, एकसुरीच ठरतो हे पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केलं. कोलंबोतल्या आर.प्रेमदासा स्टेडियमच्या संथ आणि धीम्या खेळपट्टीवर भारतीय संघाने १७५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानने पॉवरप्लेमध्येच तीन शिलेदार गमावले. यानंतर सातत्याने विकेट्स गमावत पाकिस्तानच्या संघाने मान टाकली. त्यांचा डाव .. आटोपला. पाकिस्तानने मूळ योजनेनुसार या लढतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक नुकसान शक्यता आणि आयसीसीची मध्यस्थी यानंतर पाकिस्तानने ही लढत खेळण्याचा निर्णय घेतला. अंतर्गत बंडाळ्यांनी ग्रस्त पाकिस्तान संघाला सर्वसमावेशक खेळ करणं जमलं नाही आणि त्यांच्या नावावर पुन्हा एकदा पराभूत असा शिक्का बसला. या विजयासह भारतीय संघाने तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे बाद फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानला बाद फेरीसाठी संघर्ष करावा लागणार आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. कर्णधार सलमान अली अघा गोलंदाजीला आला.
पहिल्या षटकात फिरकी आक्रमणाचा निर्णय पाकिस्तानने घेतला. अभिषेक शर्माला बाद करत सलमानने हा निर्णय योग्य ठरवला. यानंतरही पाकिस्तानने फिरकी बहुल आक्रमणावर भर दिला. तिलक वर्मा झगडत असतानाही इशान किशनने जोरदार फटकेबाजी केली. फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजांवर तुफान आक्रमण करत इशानने इरादे स्पष्ट केले. इशानच्या ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ७७ धावांच्या खेळीसह भारताच्या विजयाचा पाया रचला. सईम अयुबने इशानला बाद केलं. इशान बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या प्रत्येक फलंदाजाला धावांसाठी झगडावं लागलं. तिलक वर्माने २४ चेंडूत २५ तर सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२ धावा केल्या. भरवशाचा हार्दिक पंड्या भोपळाही फोडू शकला नाही. शिवम दुबेने १७ चेंडूत २७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. संपूर्ण डावात केवळ ६ षटकार लगावले गेले. पाकिस्तानतर्फे सईम अयुबने ३ विकेट्स पटकावल्या. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने पहिल्याच षटकात साहिबजाहा फरहानला गमावले. हार्दिक पंड्याने त्याला बाद केलं. जसप्रीत बुमराहच्या भेदक यॉर्करसमोर सईम अयुब निरुत्तर झाला. बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याचा मोह सलमान अली अघाला आवरला नाही आणि तोही बाद झाला. बाबर आझमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अक्षर पटेलने त्याला त्रिफळाचीत केलं. उस्मान खानने ४४ धावांची एकाकी झुंज दिली. बाकी फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे पाकिस्तानचा डाव ११४ धावांतच आटोपला. भारतातर्फे हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. तसेच महिलांचा रायझिंग स्टार आशिया चषक २०२६ बँकॉकमध्ये खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान अ महिला संघांमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तान संघावर एकतर्फी विजय मिळवला. गोलंदाजीत भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत अवघ्या १० षटकांत संघाने हा सामना जिंकला आहे. राधा यादव रायझिंग स्टार आशिया चषकात भारताच्या महिला संघाचं नेतृत्त्व करत आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात संघाला युएईच्या अ संघाविरूद्ध पराभव पत्करावा लागला होता. पण पाकिस्तानविरूद्ध सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताच्या अ संघाने स्पर्धेतील आपली मोहिम कायम ठेवली आहे. पाकिस्तानने दिलेल्या ९४ धावांचं लक्ष्य टीम इंडियाने १०.१ षटकांत पूर्ण केलं. भारताकडून हुमैरा काझी पहिल्या षटकात झेलबाद झाली. यानंतर अनुष्का शर्मा व वृंदा दिनेश यांनी ५० चेंडूत ७९ धावांची भागीदारी केली. अनुष्का २४ धावांवर झेलबाद झाली. यानंतर वृंदा दिनेशने २९ चेंडूत १२ चौकारांसह ५५ धावांचा नाबाद खेळी केली आणि संघाच्या विजयाचा हिरो ठरली. तर तेजल हसबनीसने ५ चेंडूत १ चौकार व षटकारांसह १२ धावा केल्या. यासह टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला.






