मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये लवकरच एमआरआय सेवा उपलब्ध होणार असून यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कंत्राटदाराला (सर्वात कमी दर) आधारावर काम देण्यात आले असून प्रत्येक रुग्णालयासाठी स्वतंत्र वर्क ऑर्डर जारी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. यामुळे मुंबईतील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, महानगरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या केईएम, नायर, कूपर आणि सायन या चार महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक एमआरआय सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना खासगी केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार असून, कमी खर्चात आणि वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे. एमआरआय ही अत्यंत महत्त्वाची निदान चाचणी असून मेंदू, मणका, स्नायू तसेच अंतर्गत अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र, आतापर्यंत पालिका रुग्णालयांमध्ये ही सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. एमआरआय सेवेसाठी मागील काही वर्षापासून सातत्याने मागणी होत होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही या मुद्द्यावर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने या प्रक्रियेला गती देत टेंडर पूर्ण करून आता प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या एमआरआय सेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून वर्क ऑर्डरही जारी करण्यात आल्या आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना कमी खर्चात आणि जलदगतीने निदानाची सुविधा मिळेल. तसेच रुग्णालयांवरील ताण कमी होऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल.
एमआरआय उपलब्ध झाल्यास होणारे फायदे :
- वेटिंग लिस्ट कमी होणार सध्या असलेली दीर्घ प्रतीक्षा यादी मोठ्या प्रमाणात घटणार
- जलद निदान आजारांचे लवकर व अचूक निदान होणार
- कमी खर्च – खासगी केंद्रांच्या तुलनेत स्वस्त दरात सेवा
- स्थानिक पातळीवर सुविधा – शहरांत सहज उपलब्धता
- रुग्णांचा वेळ वाचणार अपॉइंटमेंटसाठी होणारा विलंब कमी.







