पनवेल : पनवेल महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा शैक्षणिक साहित्य थेट वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील शैक्षणिक वर्षात थेट लाभ हस्तांतरण योजनेतील विविध अडचणींमुळे ९३२ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा लाभ मिळू शकला नव्हता. त्यामुळे कोणताही विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महापालिकेने यंदा साहित्याची थेट खरेदी करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल महापालिकेच्या ११ शाळांमध्ये यंदा एकूण २ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मागील वर्षी २ हजार ४४७ विद्यार्थ्यांपैकी केवळ १ हजार ५१५ विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला होता. अनेक विद्यार्थ्यांची बँक खाती नसणे, खात्यांची माहिती उपलब्ध न होणे आणि तांत्रिक अडचणी यामुळे उर्वरित विद्यार्थी लाभापासून वंचित राहिले होते. परिणामी अनेक पालकांना स्वतःच्या खर्चातून शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीऐवजी साहित्याचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून पाठ्यपुस्तके, गणवेश आणि दप्तरे उपलब्ध झाल्यानंतर इतर शैक्षणिक साहित्यही विद्यार्थ्यांना थेट दिले जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मराठी, उर्दू आणि गुजराती माध्यमाच्या १० शाळांतील २ हजार ५३ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश, काळे बूट, मोजे आणि दप्तरे देण्यात येणार आहेत. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील ३६० विद्यार्थ्यांनाही ही सुविधा मिळणार आहे. याशिवाय सर्व २ हजार ४१३ विद्यार्थ्यांना व्यायामासाठीचा गणवेश, व्यायामासाठीचे बूट, मोजे आणि पावसाळी अंगरखा उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक साहित्य मिळावे आणि पालकांवरील आर्थिक ताण कमी व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.







